सेक्स टॉनिक' पासून सावधान


/photo/17833681.cms
'सेक्स टॉनिक' पासून सावधान!
'डॉक्टर, माझी सेक्सपॉवर कमी झालीय. इच्छेनुसार मी ती आणू शकत नाही. ऐनवेळी ती घात करते. मला एखादे सेक्स टॉनिक देता का?' असं विचारणारे हजारो पुरुष माझ्या दवाखान्यात येऊन गेलेत. लैंगिक उत्तेजकांचा (सेक्स टॉनिक) शोध माणूस अनादी काळापासून घेत आलाय. जे औषध, वनस्पती, जडीबुटी, पदार्थ, रसायन घेतल्याने पुरुषाची सेक्सपॉवर वाढेल, अशा औषधाचा शोध आयुर्वेपासून अॅलोपाथीपर्यंत सर्व शाखा आजही घेत आहेत.

लैंगिक संबंधांबाबत फार सूचक अशी रचना निसर्गाने ठेवली आहे. ती म्हणजे लैंगिकता एकमेकांवर लादता येत नाही. लादलीच तर त्यापासून आनंद अनुभवता येत नाही. लादलेल्या लैंगिक संबंधात जोडीदाराचा प्रतिसाद नसतो. त्याची जननेंद्रिये त्यासाठी तयार नसतात. लैंगिक संबंध दोघांच्या संमतीने, दोघांच्या इच्छेने आणि समान सहभागातून आले तरच ते सुखदायी असतात. हा अनुभव सर्व दांपत्यांना असतोच.

संबंधांची इच्छा नसेल आणि तरीही पत्नीने आग्रह धरला तर इंदियात ताठरताच येत नाही, असा अनुभव अनेक पुरुषांना येतो. साहजिकच मग इंटरकोर्स अशक्य होतो. अशा वेळी बायकोकडून नपुंसकतेचा ( Impotence) शेरा मारला जाण्याची भीती असते. केवळ पत्नीचा सहभाग आणि प्रतिसाद नसल्यामुळे इंदियात ताठरता येऊ न शकणारे पुरुष मानसिक नपुंसकतेचे बळी ठरतात.

या नपुंसकतेच्या मुळाशी त्यांच्या पत्नीची सेक्सविषयी असणारी उदासीनता कारणीभूत असते. हे या पुरुषांना अनेकदा कळत नाही. पत्नीच्या अशा उदासीनतेच्या मागे पतीने तिच्याशी पूर्वी केलेले स्वार्थी आणि एकांगी लैंगिक वर्तन ( Sexual Behavior) कारणीभूत असतं. असे पुरुष मग स्वत:ची सेक्सपॉवर वाढावी, यासाठी पत्नीच्या प्रतिसादाशिवाय इतर काही मार्ग, उपाय आहेत का? याचा शोध घेऊ लागतात. या स्वार्थी शोधाचा मार्ग त्यांना तथाकथित सेक्स टॉनिक्सपर्यंत घेऊन जातो.

सेक्स टॉनिक हे बेजबाबदार पुरुषाचं स्वप्न आहे. जोवर पुरुष स्वत:च्या लैंगिक वर्तनाची पूर्ण जबाबदारी घेत नाही; तोवर त्याची फसवणूक करणारी ही सेक्स टॉनिक्स निर्माण होतच राहतील, यात शंका नाही.

लैंगिक तक्रारी असलेल्या पुरुषांमध्ये साधारण दोनच तक्रारी प्रामुख्याने दिसून येतात. एक म्हणजे नपुंसकता आणि दुसरी शीघ्रपतन. बहुतेक टॉनिक्सच्या जाहिराती 'या दोन्ही तक्रारींसाठी उपयोगी' असा स्पष्ट दावा करतात. असा दावा करण्यातच त्यांचा खोटेपणा उघड होतो, कारण नपुंसकता आणि शीघ्रपतन या दोन्ही पूर्ण विरुद्ध कारणांमुळे निर्माण होणा-या तक्रारी आहेत. नपुंसकता (किंवा लिंगामध्ये ताठरता कमी येणं) ही तक्रार उत्तेजना कमी असल्याने निर्माण होते तर शीघ्रपतन ही तक्रार उत्तेजना जास्त असल्यामुळे. मग या दोन तक्रारींसाठी औषध मात्र एकच असणं कसं शक्य आहे?

अविवाहित तरुणही सेक्स टॉनिकच्या जाहिरातबाजीला बळी पडतात. केवळ स्वत:बद्दल आत्मविश्वास नसल्याने लग्नानंतर आपण कमी तर पडणार नाही ना अशी भीती त्यांच्या मनात असते. अशावेळी औषधाची नव्हे तर आत्मविश्वास वाढवण्याची गरज असते. तो वाढवण्याचा एकमेव उपाय म्हणजे योग्य सेक्स एज्युकेशन. योग्य ज्ञान मिळताच आपल्यात कुठलेही वैगुण्य नाही, आपण नॉर्मल आहोत, हे त्याच्या ध्यानात येतं आणि आत्मविश्वास येतो.

आपण हस्तमैथुन करतो, स्वप्नात कधीकधी आपलं वीर्यपतन होतं, आपलं इंदिय इतरांच्या मानाने लहान आहे, त्यामुळे भावी पत्नीला आपण सुख देऊ शकणार नाही, असा न्यूनगंड नव्वद टक्के तरुणांमध्ये असतो. या सर्वातला खरेखोटेपणा समजून घेण्याचा योग्य मार्ग कोणता हे त्यांना माहीत नसतं. अशा स्थितीत या अज्ञानाचा फायदा घेऊन त्याचा धंदा करणाऱ्या वैदू आणि सेक्स क्लिनिक्सच्या जाहिरातींना तरुण बळी पडतात. अशा बनावट, अनरजिस्टर्ड दवाखान्यांमध्ये मग तथाकथित सेक्स टॉनिक्स दिली जातात. बहुतेकदा ही औषधे आयुवेर्दिय किंवा युनानी असल्याचा दावा केला जातो.

'सेक्स टॉनिक म्हणता येईल, असं एकही अस्सल औषध जगातल्या कुठल्याही वैद्यकशाखेत अजून अस्तित्वात नाही,' हे सत्य पुरुषजातीला स्वीकारावं लागेल. त्यातूनच जबाबदार अशा लैंगिक वर्तनाची सुरुवात होऊ शकेल.

- डॉ. राजन भोसले

Share this

Related Posts

Previous
Next Post »